गच्चीवरुन पडल्याने कामगाराचा झाला मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला
पुणे : विद्युत जोडणीचे काम करताना गच्चीवर लावलेल्या शिडीवरुन पडल्याने कामगाराचा (वायरमन) मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरीतील वृंदावननगर भागात घडली. कामगाराच्या सुरक्षेची काळजी न घेता हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून विद्युत विषयक कामे करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युसुफ शेख (वय ४७, रा. कोंढवा) असे मृत्यूमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे.
वडगाव शेरीतील वृंदावननगर भागात ४ जानेवारी रोजी दुपारी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, वडगाव शेरीतील वृंदावननगरमधील एका गृहप्रकल्पावर शेख हे विद्युतविषयक कामे करत होते. त्यावेळी गच्चीवर काम करत असताना लोखंडी शिडी घसरल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शेख यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती साधनसामुग्री पुरविणे आवश्यक होते. मात्र, ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवून पोलिसांनी याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. येरवडा पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
संपादक -आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039




