ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीचा मृत्यू; कात्रज भागात धक्कादायक घटना

पुणे – पुण्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या घडना उघडकीस येत असतात. अशातचं आता भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पाठिमागे बसलेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर, दुचाकी चालक तरुण जखमी झाला. कात्रज भागात हा अपघात घडला आहे.
याप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनी कृष्णा श्रीवास्तव (वय २४, रा. वडाळा, मुंबई) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार करण प्रवीण चिकणे (वय २४, रा. दत्तनगर, आंबेगाव, कात्रज) हा जखमी झाला आहे. चिकणे याने याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी ट्रकचालक सागर विलास थोरा (वय २९, रा. काशीद बिल्डींग, मांगडेवाडी, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार करण आणि त्याची मैत्रीण सोनी कात्रज भागातून निघाले होते. त्यावेळी गुजरवाडी फाटा परिसरात पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात पाठिमागे बसलेली सोनी या ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




