स्वारगेट बसस्थानकातून 6 लाखांचे दागिने लंपास, पोलिसांकडून तपास सुरु

पुणे : स्वारगेट बसस्थानकातून कोल्हापूरला जाण्यास गाडीत बसलेल्या सराफाच्या कामगाराकडील पिशवीतील ६ लाख ६० हजार रूपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ३१ ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी कोल्हापूर येथील एका 36 वर्षीय व्यक्तीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कोल्हापूर येथील राहणारे आहेत. ते एका सराफाकाकडे काम करतात. दागिने देण्यासाठी ३१ ऑक्टोबरला पुण्यात आले होते. काम झाल्यानंतर ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकात आले. कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या गाडीत बसले. त्यांनी दागिन्यांची पिशवी शेजारी ठेवली. त्यानंतर ते बस केव्हा सुटणार आहे, याची माहिती घेत असताना, चोरट्याने त्यांच्या पिशवीतील साडेसहा लाखांचे दागिने चोरून नेले. काही वेळानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली. अधिक तपास उपनिरीक्षक पुनम पाटील करीत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




