‘प्रक्षोभक भाषण करू नका’; ओवैसींना भर सभेत पोलिसांकडून नोटीस

सोलापूर – एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ओवैसी त्यांच्या एमआयएम पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज सोलापुरात आले. पण मंचावर येताच पोलिसांनी त्यांच्या हातात नोटीस दिली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दी यांच्या प्रचारसभेला आलेल्या ओवैसी यांना पोलिसांकडून मंचावरच नोटीस देण्यात आली आहे. ओवैसी यांनी आपल्या भाषणात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाही, प्रक्षोभक भाषण करू नये, अशी नोटीस पोलिसांनी दिली. पोलिसांनी ओवैसी यांना भारतीय नागरिक संहिता कलम 168 प्रमाणे नोटीस दिली. या नोटीसचा उल्लेख ओवैसी यांनी आपल्या भाषणात करत टीका केली. असदुद्दीन ओवैसी यांनी संबंधित नोटीस जाहीर भाषणात वाचून दाखवत उडवली खिल्ली उडवली. त्यांनी इंग्रजीमध्ये दिलेल्या नोटीसमधील स्पेलिंग मिस्टेक दाखवत खिल्ली उडवली. तसेच त्यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
दरम्यान, सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत पठण यांनी एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. शौकत पठाण हे स्वतः सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुक होते. मात्र काँग्रेसने शौकत पठाण यांना उमेदवारी नाकारल्याने ते काही दिवसापासून नाराज होते. आज ओवैसी यांच्या सभेत थेट मंचावर येऊन शौकत पठण यांनी एमआयएम उमेदवार फारुख शाब्दी यांना पाठिंबा दिल्याचं जाहीर केलं आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




