हेलिकॉप्टरने AB पाठवणं अंगलट! शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात

नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती. २९ ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. अशामध्ये शिंदे गटाने आपल्या पक्षाच्या नाशिकमधील दोन उमेदवारांसाठी शेवटच्या क्षणाला हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले. याचप्रकरणी आता शिवसेना शिंदे गट चौकशीच्या फेऱ्यात सापडला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या काही वेळ अगोदर हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणे शिंदे गटाच्या अंगलट आले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाने आपल्या उमेदवारांसाठी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवल्या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून विचारणा होताच जिल्हा प्रशासनाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे यासंदर्भात विचारणा करण्यात आली आहे.
हेलिकॉप्टरने एबी फॉर्म नेमकं कुणी आणलं? त्यात कोण होतं? कोणत्या उमेदवारांसाठी एबी फॉर्म मागवण्यात आले? त्याला किती खर्च आला? यासह अन्य बाबींची चौकशी होणार आहे. यासंदर्भातील चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाईच स्वरुप निश्चित होणार आहे. २९ तारखेला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या अवघ्या काही वेळ अगोदर शिंदे सेनेकडून एबी फॉर्म देण्यात आले होते. दिंडोरीच्या धनराज महाले आणि देवळालीच्या राजश्री अहिरराव यांना हे एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




