डेअरीत आग लागून मालकाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यात एका दुकानाला आग लागून त्यात दुकानाच्या मालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्याच्या सुखसागर नगर येथे ही घटना घडली. गुरुवारी मध्यरात्री १२ वजताच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती आहे. या घटनेत दुकानाचा दरवाजा तोडून आत जायला उशिर झाल्याने दुकान मालकाचा मृत्यू झाला आहे.
बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागात साळुंके यांची किसान डेअरी आहे. दररोज रात्री दूधाच्या गाड्या आल्यानंतर साळुंके डेअरीत झोपायचे. गुरुवारी रात्री ते डेअरीत झोपले होते. मध्यरात्री बाराच्या सुमारास डेअरीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी पाहिले. रहिवाशांनी डेअरीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. डेअरीत मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता.
रहिवाशांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. कात्रज अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख सुनील नाईकनवरे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. गंभीर होरपळलेल्या साळुंके यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




