मोठी बातमी! लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील ५० विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

लातूर : लातूर येथील औसा रोडवरील शासकीय वसतिगृहात विद्यार्थीनींना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. औसा रोडवरील मुलींच्या वसतीगृह क्रमांक २ मधील विद्यार्थिनींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने अनेक मुलींची तब्येत बिघडली. रात्री मुलींना उलटी, मळमळ असा त्रास होऊ लागला. त्रास झालेल्या विद्यार्थिनींवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. तसेच सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
शनिवारी हा प्रकार घडला. या वसतीगृहातील विद्यार्थिनींना सायंकाळी ७.३० वाजता जेवण देण्यात आले होते. यात भेंडीची भाजी, चपाती, भात आणि मसूरच्या दाळीचे सूप या पदार्थांचा समावेश होता. मात्र, रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अचानक काही विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. तर काहींना अचानक मळमळ होऊन उलट्या सुरु झाल्या. त्यानंतर वसतीगृहाच्या अधिक्षकांनी तत्काळ याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिली.
दरम्यान, महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी रुग्णवाहिका बोलावून या विद्यार्थिनींना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तसेच याची माहिती विद्यार्थिनींच्या पालकांनाही देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीपर्यंत जवळपास ५० विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर रविवारी पहाटे जवळपास २० विद्यार्थिनींना वसतीगृहात परत पाठवण्यात आलं.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




