लाडकी बहीण योजेनवरून अमृता फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, म्हणाल्या…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास ९० लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. सरकारने १७ तारखेच्या आत महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्यांचा निधी एकत्रितरित्या मिळून तीन हजार रुपये द्यायला सुरुवात झाली आहे. या योजनेवरुन विरोधकांकडून टीका केली जातेय. या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अमृता फडणवीस म्हणाल्या, लाडकी बहीण योजना ही बहिणींना रक्षाबंधनाची भेट आहे. महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. यातून महिला त्यांच्या लहान मोठ्या गरजा पूर्ण करू शकतील. असं फडणवीस म्हणाल्या. तसेच त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. पुढे बोलतांना अमृता फडणवीस म्हणाल्या की, जे स्वतः स्टंटमॅन आहेत त्यांनी सरकारने काय करायला हवे हे सांगू नये. सरकार योग्य काम करत असून स्टंटमॅन लोकांनी काही सांगू नये. लाडकी बहीण योजना आणि कोलकाता येथे घडलेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत देखील त्यांनी भाष्य केले. रुग्णालयात जाऊन पुरावे नष्ट केले जात आहे यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही असे फडणवीस म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम
दरम्यान ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आली आहे. या योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. १७) शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे. या कार्यक्रमास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदींसह खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




