लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तब्बल 200 कोटींचा खर्च; विरोधकांकडून सरकारवर टीका

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दोन हप्ते मिळण्यास सुरुवात झाली असतानाच, या योजनेच्या प्रसिद्धीसाठीही राज्य सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेच्या प्रसिद्धिसाठी १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार ४३६ रुपयांच्या निधीला महिला व बालविकास विभागाने मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मंजूर माध्यम आराखड्यानुसार, फोन कॉल, सिनेमागृहे, एसटी स्टँड, मेट्रो, रेल्वे आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी या योजनेची प्रसिद्धी केली जाणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली. मागील काही दिवसांपासून या योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू असतानाच, गुरुवारी या योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यावर दोन हप्ते जमा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी ही योजना राज्यात सर्वत्र पोहोचवण्यासाठी महायुती सरकारने सर्वस्व पणाला लावले आहे. त्याअंतर्गत आता या योजनेच्या प्रसिद्धीसाठी माध्यम आराखडा राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Advertisement

या आदेशाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. रोष व्यक्त करताना विजय वडेट्टीवार यांनी लिहिले आहे की, जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हफ्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र 199 कोटी 81 लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले. महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच 270 कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारसाठी तब्बल 199 कोटी 81 लाख खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस असताना हा जीआर काढण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी तर सोडा, कामकाजाच्या दिवशी सुद्धा मंत्रालयात जनतेची कामे होत नाही. दुसरीकडे मात्र महायुतीत शामिल पक्षांच्या हिताचे सरकारी निर्णय घेण्यासाठी 15 ऑगस्टचा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि शासकीय यंत्रणा सोडत नाही…. स्वतःच्या हितासाठी राबणारे किती हे तत्पर सरकार असेच म्हणावे लागेल. ह्या सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाही, पण स्वतःची बढाई करण्यासाठी जाहिरातीसाठी मात्र भरमसाठ खर्च सुरू आहे. दिल्लीत बसलेल्या सरदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवला आहे, येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page