जरांगे पाटलांना पुणे कोर्टाकडून मोठा दिलासा; अटक वॉरंट रद्द

पुणे : मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. जरांगे पाटील यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. आज न्यायालयामध्ये मनोज जरांगे यांच्या वकीलाने गेल्या सुनावणीवेळी उपस्थित नसल्याची कारणं यावेळी सांगितले आहेत. गेल्या सुनावणीला आजारी असल्यामुळे जरांगे उपस्थित राहू शकले नाहीत. ते आजारी असल्याची त्यांची मेडिकल सर्टिफिकेट आहेत. त्यामुळे त्यांचं वारंट रद्द करावं. आमचा कोर्टाचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांची आज तब्येत ठीक नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णवाहिकेमध्ये जरांगे आले आहेत, अशी माहिती जरांगेंच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे.
काय आहे फसवणुकीच प्रकरण?
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका नाटकाच्या प्रयोगांचं आयोजन केलं होतं. या प्रयोगाचे नाट्य निर्मात्याला पूर्ण पैसे न दिल्याप्रकरणी संबंधित नाट्यनिर्मात्यानं कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता आणि जून महिन्यात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्याचा खटला सध्या पुणे कोर्टात सुरु आहे. पण याआधी त्यांनी वैद्यकीय अहवालाचा दाखला देऊन कोर्टात हजर राहिले नव्हते.
मनोज जरांगे पाटील सातत्याने उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. संभाजीनगर येथील गॅलॅक्सी रुग्णालयात त्यांच्यावर मूत्रपिंड विकारासंबंधित उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्लाही दिला होता. त्यामुळे ते कोर्टात हजर राहू शकले नाहीत. त्यांनी कोर्टाला यासंदर्भत क्षमायाचिका सादर केली होती. दरम्यान त्यांना डॉक्टरांनी प्रवास टाळण्याचे सुचवले असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी सुनावणीच्या वेळी रुग्णवाहिकेतून कोर्टात हजेरी लावली.
मनोज जरांगे पाटील कोर्टासमोर हजर झाले. यासाठी पाटील रात्री २ वाजता पुण्यात दाखल झाले होते. जरांगेंनी वैद्यकीय अहवालाच्या आधारावर कोर्टासमोर अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी केली होती. कोर्टानेही वैद्यकीय अहवालांच्या आधारे अटक वॉरंट रद्द करुन मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दिलासा दिला आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




