पंतप्रधान मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील वाहतूकीत बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

पुणे – राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी जोरदार प्रचार केला जात आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपूर्ण महाराष्ट्रात सभा पार पडताना दिसत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. आज सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदींची सभा होत आहे. या निमित्ताने महायुतीच्या शहरातील उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून नुकतंच पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार असल्याने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांसह या दौऱ्याची मुख्य जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे असणार आहे.
यामुळे लोहगाव विमानतळ ते सभा स्थळापर्यंत मार्गाची पाहणी केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून करण्यात आली आहे. तसेच विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वानपथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तासाठी असणार आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, दहा पोलीस उपायुक्त, २३ सहायक पोलीस आयुक्त, १३५ पोलीस निरीक्षक, ५७० पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
असे असतील वाहतुकीत बदल
शहरातील सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनी भागातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद
वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृहमार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगडरस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे.
बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद.वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जाॅगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे.
मध्यभागातील वाहतूक बदल
टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक करण्यात येणार आहे.
वाहनचालकांनी काकासाहेब गाडगीळ पूल (झेड ब्रीज) डावीकडे वळून भिडे पुल चौकातून उजवीकडे वळून इच्छितस्थळी जावे.
गरुड गणपती चैाक ते भिडे पूल चौक दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे.
वाहनचालकांनी गरुड गणपती चौकातून डावीकडे वळून टिळक चौकातून वळून केळकर रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे.
डेक्कन जिमखाना परिसरातून भिडे पूलमार्गे केळकर रस्त्यावर येण्यास वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नदीपात्रातील रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




